- दारव्हा येथे ४४ महिलागटांना ई-रिक्षाचे वितरण
- जिल्ह्यात १ हजार गटांना मिळतील ई-रिक्षा
- महिला गारमेंट क्लस्टरची संख्या वाढविणार
यवतमाळ, दि.२८ (जिमाका) : रस्ते, पाणी, वीज यासारख्या विविध सुविधा सातत्याने उपलब्ध करुन दिल्या जातात. परंतु, महिलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होण्यासोबतच त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी जिल्ह्यात आपण अनेक उपक्रम राबवतो आहे. महिला गटांना त्यांचा व्यवसाय वाढविण्यासाठी ई-रिक्षासह उत्पादीत मालाला तालुका स्तरावर हक्काची जागा उपलब्ध करुन देण्यात येत आहे, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
दारव्हा येथे खनिज विकास निधी व अनुसूचित जाती उपयोजनेतून महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने पालकमंत्र्यांच्याहस्ते 44 गटांना तेजस्विनी कृषी वाहतूक ई-रिक्षाचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी डॉ.रंजन वानखडे, माजी पंचायत समिती सभापती सुनिता राऊत, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, मनोज सिंघी, लेखाधिकारी शैलेंद्र जिड्डेवार आदी उपस्थित होते.
महिलांना रिक्षाचे वाटप करतांना रिक्षा दर्जेदार आणि नामांकित कंपनीचाच असावा याची दक्षता घेण्यात आली आहे. 111 रिक्षांना मंजुरी दिली आहे. परंतू जिल्ह्यात आपण माविम व उमेदच्या प्रत्येकी 500 याप्रमाणे एक हजार महिला गटांना ई-रिक्षांचे वाटप करतो आहे. हा रिक्षा गटांना सक्षम करण्यासोबतच त्यांना आर्थिकदृष्ट्या पुढे नेण्यासाठी हातभार लावेल, असे पालकमंत्री श्री.राठोड पुढे बोलतांना म्हणाले.
दारव्हा तालुक्यात धामणगाव येथे महिलांसाठी गारमेंट क्लस्टर सुरु केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याने नेर व दिग्रस येथे देखील क्लस्टर होणार आहे. महिलांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळत असल्याने क्लस्टरची संख्या वाढविण्याचा प्रयत्न आहे. दारव्हा शहरात देखील क्लस्टर उभे राहिले पाहिजे, अशी माझी भूमिका आहे. त्यादृष्टीने सूचना करण्यात आल्या आहेत.
महिला गट सुरुवातीस पारंपरिक वस्तू, मालाची निर्मिती करत होते. आता बाजारपेठेला आकर्षित करणाऱ्या वस्तूंची निर्मिती केली जात आहे. या वस्तू, मालाच्या विक्रीसाठी हक्काची जागा नसल्याची तक्रार महिला माझ्याकडे नेहमीच करतात. त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणासह दारव्हा, दिग्रस, नेर येथे तालुकास्तरावर महिलांना विक्रिसाठी स्वतंत्र जागा देण्याचे नियोजन आपण केले आहे. माविम व उमेदला प्रत्येकी 25 याप्रमाणे 50 गाळे पगडी शिवाय नाममात्र दराने उपलब्ध होतील, असे श्री.राठोड यांनी सांगितले.
महिलांच्या प्रभाग संघांना ईमारतीसाठी निधी उपलब्ध करुन दिला जात आहे. यापूर्वी आपण 16 महिला बचत गटांना फवारणी ड्रोन दिले. अजून काही गटांना देतो आहे. जिल्ह्यात महिलांसाठी विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून त्यांना सक्षम करण्याचा माझा प्रयत्न असल्याचे पालकमंत्री म्हणाले. यावेळी माजी पंस सभापती सुनिता राऊत व डॉ.रंजन वानखडे यांची देखील भाषणे झाली.
सुरुवातीस पालकमंत्र्यांनी खनिज विकास निधीतील 34 तर अनुसूचित जाती उपयोजनेतून 10 असे 44 ई-रिक्षांचे वितरीत केले. यावेळी त्यांच्याहस्ते दारव्हा येथील लक्ष्मी महिला बचतगटास 8 लाख 88 हजार व रेणूका बचतगटास 10 लाख रुपयाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. माविमच्या उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना सत्कार देखील करण्यात आला. कार्यक्रमास बचतगटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.