राज्य शासन महाराष्ट्राच्या समतोल औद्योगिक विकासासाठी कटिबद्ध आहे. उद्योग विभाग व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या समन्वयाने विविध उपक्रम हाती घेण्यात आले. त्यातून राज्याकडे आकर्षित झालेली मोठी गुंतवणूक, निर्माण झालेल्या रोजगाराच्या संधी हे सरकारचे मोठे यश असल्याचे सांगून रायगड जिल्ह्यासह कोकणच्या सर्वांकष औद्योगिक विकासाला गती देण्यात येत आहे. या जिल्ह्यामध्ये झालेली गुंतवणूक कोकणच्या दृष्टीने भूषणावह असल्याचे गौरवोद्गार उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी काढले.
गत दोन वर्षात महाराष्ट्राने औद्योगिक क्षेत्रात साध्य केलेल्या प्रगतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र आज भारतात पहिल्या स्थानावर आहे. अनेक महत्त्वाचे निर्णय शासनाने या दोन वर्षात घेतले. महाराष्ट्राने घेतलेल्या अनेक महत्त्वाच्या निर्णयाची माहिती उद्योग जगत साकारणाऱ्या उद्योजकांना, व्यवसायिकांना व्हावी, राज्याचे व्हिजन कळावे या उद्देशाने उलवे, पनवेल येथे आयोजित ‘उद्यमात सकल समृद्धी, महाराष्ट्राची उद्योग भरारी’ कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. यावेळी मंचावर सुनील तटकरे, आमदार महेश बालदी, ज्येष्ठ नेते रामशेठ ठाकूर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू, विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, अतिरिक्त विकास आयुक्त प्रदीप चंद्रन, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, उद्योग सह संचालक विजू सिरसाठ, जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक गुरुशांत हरळय्या आदी उपस्थित होते.
राज्यात अनेक गेमचेंजर प्रकल्प येत आहेत हे सांगताना आनंद होत असल्याचे सांगून उदयोग मंत्री श्री. सामंत म्हणाले उद्योगांना पोषक वातावरण तयार झाले आहे. राज्यात उद्योग वाढावेत, यादृष्टीने उद्योजकांना सबसिडीसह विविध सवलती आणि सुविधा प्रदान केल्या जात आहेत. राज्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी शासनाने अतिशय सकारात्मक धोरण स्वीकारले. विदेशातील उद्योजकांना राज्यात निमंत्रित करण्यासाठी औद्योगिक क्षेत्राला अत्यावश्यक असणारी पायाभूत सेवा सुविधा, स्वच्छता, सुरक्षितता आणि काम करणाऱ्या कामगारांच्या आरोग्याची शाश्वतता जपणे याला प्राधान्य दिले. याला अपेक्षित यश मिळाले आहे. गेल्या तीन महिन्यात महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक 75 हजार कोटी रुपये झाली असून महाराष्ट्र देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य असल्याचे मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.
रायगड जिल्ह्यात 83 हजार कोटींचा सेमी कंडक्टर प्रकल्प येत आहे. तसेच विविध 50 हजार कोटींचे प्रकल्प येत आहेत. ३८ हजार कोटींची गुंतवणूक क्षमता असलेल्या दिघी पोर्टला मंजुरी मिळाली आहे. यामुळे भविष्यात रायगड जिल्हा उद्योग नगरी म्हणून ओळख निर्माण करेल असेही मंत्री श्री. सामंत यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती उपक्रमाद्वारे 35 हजार जणांना रोजगार मिळाला आहे. हे उद्योग विभागाचे यश आहे. कोणताही प्रकल्प स्थलांतरित होत नसून उलट परकीय गुंतवणूक वाढत असल्याचे ते म्हणाले.
राज्याच्या उद्योग विभागाने उत्तुंग भरारी घेतली आहे, यासाठी उद्योग विभागाचे अभिनंदन करून खासदार सुनील तटकरे म्हणाले की, गडचिरोली सारख्या भागात देखील औद्योगिक विकास होतोय, रोजगार निर्मिती होतेय ही जमेची बाजू आहे. राज्यात गुंतवणूक, रोजगार निर्मिती झपाट्याने होत आहे. ग्रामीण भागात उद्योगाचे जाळे विस्तारते आहे. सिडकोमुळे नवी मुंबई आणि परिसराचा विकास होतो आहे. अटल सेतूमुळे मुंबईशी जवळीक वाढली आहे. राज्यात सर्वंकष औद्योगिक विकास होतोय. मध्यम आणि लघु उद्योगाच्या भूमिपुत्र उद्योजकांना देखील सवलती देण्याबाबत कार्यवाही करावे. राज्यातील वाढती गुंतवणूक ही राज्याच्या विकासासाठी फायदेशीर आहे. या माध्यमातून मोठया प्रमाणावर रोजगार निर्माण होईल. दक्षिण रायगड जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणावर क्षमता आहेत. दिघी पोर्टमुळे या भागाच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास श्री. तटकरे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणी साठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असेही श्री. तटकरे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आमदार महेश बालदी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू, यांची भाषणे झाली.
यावेळी उद्योग विभागातर्फे देण्यात येणाऱ्या विविध लाभांचे प्रातिनिधिक वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक गुरुशांत हरळय्या यांनी केले. विविध औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी, उद्योजक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.