राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (26 सप्टेंबर 2024) सियाचीन येथील लष्करी तळाला भेट दिली आणि सियाचीन युद्ध स्मारक येथे श्रद्धांजली वाहिली. हे युद्ध स्मारक म्हणजे 13 एप्रिल 1984 रोजी भारतीय सैन्याने सियाचीन ग्लेशियरवर ऑपरेशन मेघदूत सुरू केल्यापासून शहीद झालेल्या सैनिक आणि अधिकाऱ्यांच्या बलिदानाचे प्रतीक आहे. तिने तैनात असलेल्या जवानांना देखील त्यांनी संबोधित केले.
जवानांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, सशस्त्र दलांच्या सर्वोच्च कमांडर म्हणून आपल्याला या दलांचा खूप अभिमान वाटतो आणि सर्व नागरिक त्यांच्या शौर्याला सलाम करतात.
राष्ट्रपती म्हणाल्या की, एप्रिल 1984 मध्ये ऑपरेशन मेघदूत सुरू झाल्यापासून भारतीय सशस्त्र दलातील शूर सैनिक आणि अधिकाऱ्यांनी या प्रदेशाची सुरक्षा कायम राखली आहे. त्यांना अत्यंत प्रतिकूल हवामानाचा सामना करावा लागतो. प्रचंड बर्फवृष्टी आणि उणे 50 अंश तापमान अशा कठीण परिस्थितीत ते पूर्ण निष्ठेने आणि सतर्कतेने त्यांच्या आघाडीवर तैनात असतात. मातृभूमीच्या रक्षणासाठी त्याग आणि सहनशीलतेचे विलक्षण उदाहरण ते प्रस्तुत करतात. त्यांनी जवानांना सांगितले की, सर्व भारतीयांना त्यांच्या बलिदानाची आणि शौर्याची जाणीव आहे आणि आम्ही त्यांचा आदर करतो.