अमेरिकेच्या वाणिज्यमंत्री जीना रायमोंडो यांच्या निमंत्रणावरून, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री, पीयूष गोयल 30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2024 या कालावधीत देणार अमेरिकेला भेट.
आपल्या अमेरिका दौऱ्यात पीयूष गोयल आघाडीच्या अमेरिकी आणि भारतीय कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधणार असून भारतातील गुंतवणुकीच्या अपार संधींबाबत चर्चा करणार आहेत. अमेरिका-भारत धोरणात्मक भागीदारी अंतर्गत आयोजित केलेल्या व्यवसाय आणि उद्योगजतातील आघाडीच्या नेत्यांबरोबरच्या या गोलमेज परिषदेत भारत आणि अमेरिका या अर्थव्यवस्थांमधील परस्परांना पूरक बलस्थाने आणि समन्वय अधिक दृढ करण्यावर ते भर देतील. याशिवाय ते अग्रणी युवा उद्योजकांच्या आणि भारत-अमेरिका रत्ने आणि आभूषणे उद्योगाच्या गोलमेज परिषदेचे अध्यक्षपद देखील भूषवणार आहेत.
गोयल यांच्या या दौऱ्यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील मजबूत आणि वृद्धिंगत होणाऱ्या व्यापार आणि गुंतवणूक संबंधांना आणखी चालना मिळेल. यामुळे उद्योग ते उद्योग स्तरावरील सहभागाला प्रोत्साहन मिळेल आणि दोन्ही बाजूंना प्राधान्य देणाऱ्या गंभीर खनिजे, पुरवठा साखळीत लवचिकता निर्माण करणे, हवामान आणि स्वच्छ तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य, डिजिटल व्यवहारातील सर्व समावेशी वृद्धी, मानके आणि यथायोग्य सहकार्य, प्रवास आणि पर्यटन या क्षेत्रांमध्ये धोरणात्मक भागीदारीला प्रोत्साहन देईल.