37व्या अखिल भारतीय टपाल बुद्धिबळ स्पर्धा-2024ला पणजी इथे प्रारंभ

महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळ टपाल क्रीडा मंडळ 37 व्या अखिल भारतीय टपाल बुद्धिबळ स्पर्धा-2024 चे यजमानपद भूषवत आहे. गोव्यात पणजी इथे मेनेझेस ब्रगॅन्झा संस्थेच्या सभागृहात ही स्पर्धा होत आहे. सोमवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी मुख्य अतिथी म्हणून गोव्याचे मत्स्योद्योग  मंत्री नीळकंठ हळरणकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. ही स्पर्धा 27सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.

नीळकंठ हळरणकर यांनी आपल्या भाषणात सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहन दिले. मुख्य पोस्टमास्तर जनरल अमिताभ सिंह यांनी ही स्पर्धा भारतीय टपाल खात्यातील कर्मचाऱ्यांना बुद्धीबळाचे कौशल्य आजमावण्याची उत्तम संधी असल्याचे सांगितले. या स्पर्धेनिमित्त 37 वी अखिल भारतीय टपाल बुद्धिबळ स्पर्धा-2024 विशेष टपाल पाकिटाचे प्रकाशन करण्यात आले. पहिले पाकीट अमिताभ सिंह यांच्या हस्ते मंत्री हळरणकर यांना देण्यात आले.

देशातील 20 टपाल परिमंडळातील  एकूण 121 खेळाडू या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत उतरले आहेत. सहभागी परिमंडळांमध्ये  आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगढ, दिल्ली, गुजरात, हरयाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि कश्मीर, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ईशान्य, ओदिशा, पंजाब, राजस्थान, तमिळनाडू, तेलंगण, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे. स्पर्धेसाठी मुख्य पंच अरविंद म्हामळ हे जोत्स्ना सारीपल्ली, आशा शिरोडकर आणि सुधाकर परगार या उपपंचासह परीक्षण करत आहेत. नवी दिल्लीतील  टपाल महासंचालनालयाचे सहाय्यक महासंचालक (प्रशासन) विनायक मिश्रा यांची मुख्य निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लोकेश कुमार मीना यांना तांत्रिक प्रतिनिधी म्हणून नेमण्यात आले आहे.

गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष महेश कांदोळकर उद्घाटन सोहळ्याला मानद अतिथी म्हणून उपस्थित होते. गोवा प्रदेशाचे पोस्टमास्तर जनरल रामचंद्र जायभाये, महाराष्ट्र परिमंडळचे टपाल सेवा  संचालक अभिजीत बनसोडे, गोवा प्रदेशाचे टपाल सेवा संचालक रमेश पाटील या कार्यक्रमाला उपस्थित होते. पीपल्स हायस्कूल, पणजी आणि सेंट मायकेल्स कॉन्वेंट हायस्कूल वागाटोर, अंजुनाच्या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे मार्च-पास्ट आणि बँड सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *