प्रभावी शासन आणि स्वच्छतेकरिता नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचा विशेष अभियान 4.0 मध्ये सहभाग

नागरी हवाई वाहतूक मंत्रालय प्रलंबित प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्याच्या आणि आपल्या कार्यालयांमध्ये स्वच्छता संस्थात्मक करण्याच्या उद्देशाने 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान राबवण्यात येणाऱ्या विशेष अभियान 4.0 मध्ये सहभागी झाले आहे. शासनाचा सहभाग आणि प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी भारत सरकारच्या सध्या सुरू असलेल्या प्रयत्नांना अनुसरून हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

नागरी हवाई वाहतूकमंत्री राम मोहन नायडू यांनी या संदर्भात 27 सप्टेंबर 2024 रोजी एका आढावा बैठकीचे आयोजन केले आणि त्यामध्ये या अभियानांची स्पष्ट उद्दिष्टे निर्धारित केली. या उपक्रमाचा एक भाग म्हणून स्वच्छता सुधारण्यासाठी  आणि प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी मंत्रालय वचनबद्ध आहे.

या अभियानाच्या पूर्वतयारीच्या टप्प्यात मंत्रालयाने विविध श्रेणींमध्ये प्रलंबित कामांची वर्गवारी केली आहे. यामध्ये प्रत्यक्ष कागदपत्रे असलेल्या बिगर-डिजिटल 16,580 फायली, 2093 इलेक्ट्रॉनिक फायलींचा आढावा, सार्वजनिक तक्रारीची 283 प्रकरणे, सार्वजनिक तक्रारींच्या अपिलाची 100 प्रकरणांचा निपटारा यांचा समावेश आहे. त्याशिवाय या अभियानादरम्यान, स्वच्छताविषयक उपक्रम राबवण्यासाठी 678 स्थाने देखील निश्चित करण्यात आली आहेत.

या आढावा बैठकीला नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि संघटनांचे प्रमुख उपस्थित होते. यापूर्वीच्या उपक्रमांच्या कामगिरीच्या आधारावर, या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीला पाठबळ देणाऱ्या प्रमुख उपक्रमांवर मंत्रालयाचा भर असेल.

पारदर्शकतेला चालना देण्यासाठी, प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि विशेष अभियान 4.0 च्या प्रभावी अंमलबजावणीच्या माध्यमातून स्वच्छतेचा पुरस्कार करण्यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालय नेहमीच समर्पित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *